महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आणि नुकत्याच बदलापूरमध्ये तीन शालेय मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सहभागी होत आहेत. ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Pune News
डेक्कन एक्स्प्रेसच्या वेळेत बदल
या महाराष्ट्र बंदमुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या सेवा सुरू राहणार आणि कोणत्या बंद असणार याची माहिती घेणे आवश्यक आहे.
कोणत्या सेवा सुरू राहतील?
- आरोग्य सेवा: बंदच्या काळात राज्यातील आरोग्य सेवा सुरळीत सुरू राहतील. यामध्ये क्लिनिक्स, रुग्णालये आणि मेडिकल्सचा समावेश आहे.
- शाळा आणि महाविद्यालये: 24 ऑगस्ट हा शनिवार आहे. त्यामुळे अनेक शाळा-महाविद्यालये नियमित सुरू राहतील. मात्र, ज्या शाळा-महाविद्यालयांना शनिवार-रविवारची सुट्टी असते, ती बंद असतील.
- सार्वजनिक वाहतूक: राज्य सरकारने या बंदला पाठिंबा दिलेला नसल्यामुळे एसटी, रेल्वे आणि सीटी बस सेवा सुरू राहणार आहे.
कोणत्या सेवा बंद राहतील?
राज्य सरकारने महाराष्ट्र बंदसंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत सूचना जारी केलेली नाही. तरीही काही खासगी कार्यालये आणि छोटे-मोठे व्यवसाय बंद राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, 24 ऑगस्ट हा महिन्याचा चौथा शनिवार असल्याने आरबीआयच्या नियमानुसार बँका बंद राहतील.
महाराष्ट्र बंदाविरोधात हायकोर्टात याचिका
महाराष्ट्र बंदच्या विरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अन्य काही व्यक्तींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा बंद पुकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, बंद पुकारणे हे पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे याचिकेत नमूद केले आहे.